इंद्रायणी काठी

DSC_1423

सूर्यनारायण काही अंतर वर सरकलाय. पण ते तेज अजून तितकसं प्रखर झालं नाहीये. दूरवर नदीपात्रात काहीसं धुकं आहे. हवेत प्रचंड गारठा आहे. या अशा बोचऱ्या थंडीतही लोक नदीत स्नान करत आहेत. पैलतीरावर कोणी एक सूर्याला अर्घ्य देत आहे. ऐलतीर तसा रिकामाच आहे. भल्या सकाळी मी आळंदीत इंद्रायणीच्या काठावर उभा आहे. हातापायांवर पाणी घ्यावं म्हणून घाट उतरून थोडं खाली गेलो. कधी एके काळी, समृद्ध रूपात इंद्रायणी इथून खळाळली असेल, काठावर हिरवीगार झाडी असेल, संत महात्मे इथे रोज स्नानार्थ येत असतील. आता गतकाळाच्या सुखद स्मृती तिच्या डोहात खोलवर कुठेतरी जपून, संथपणे, केवळ ती वाहते आहे. थोडं पाणी पायावर घेतलं नि घाटाच्या वरच्या दिशेने निघालो. काही स्वयंसेवक परिसर झाडताना दिसले. हे दृश्य मनाला दिलासा देणारं होतं. पुन्हा एकदा नदीकडे पाहिलं, गार वारं पाण्याला स्पर्शून अंगाला भिडत होतं. तिचं मूळ चैतन्याचं स्वरूप तिला पुन्हा पहायला मिळेल नि तिच्या वाटेतल्या गावांचे काठ फुलवत हि जीवनदायिनी सतत प्रवाही राहील अशी आशा मनी धरून मी समाधी मंदिराकडे वळलो.

मंदिरा बाहेरचा परिसर अजून भाविकांनी फुलायचा होता. काही दुकानं उघडली होती. उदबत्तीचा मंद सुगंध दरवळत होता. “दादा या इकडं, चप्पल ठेवा…” अशी साद दुकानदार घालत होते. मी घरातूनच फुलं, तुळशी घेऊन आलो होतो, पण चप्पल ठेवायच्या निमित्ताने एका दुकानातून फुलं विकत घेतली. थोड्या अंतरावर गंध लावणारे एक-दोघे उभे असलेले दिसले. त्यांना चुकवून मी देऊळवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी गेलो. समोरच खाली पितळेचं छोटं रेखीव कासव आहे. त्याला लागूनच वर गुरू हैबतबाबांची पायरी आहे. महाद्वारातुन आत जाताच मंत्रपठणाचा आवाज कानावर आला. आतलं सगळं वातावरणच प्रसन्न होतं. मनाला शांती देणारं. आवारातल्या श्री एकनाथ पाराला नमस्कार केला नि दर्शनरांगेकडे आलो. आज गर्दी कमी होती. वीणामंडपही रिकामा होता. एरवी तिथे बऱ्याचदा हरिपाठ, रंगात आलेलं कीर्तन, तल्लीनतेने ऐकणारे श्रोते असं सुंदर चित्र पहायला मिळतं. टाळ मृदंगाच्या नादात चाललेलं भजन ऐकणं हा एक तिथला अनोखा सोहळा असतो. एवढ्या सकळीक मी पहिल्यांदाच आलो होतो, त्यामुळे कदाचित सगळीकडे काहीसा निवांतपणा अनुभवायला मिळत होता. दर्शनरांग हळूहळू पुढे सरकत होती. कितीतरी वयस्कर मंडळी मागे-पुढे रांगेत दिसत होती. बहुधा ते आळंदीत मुक्कामी आले असतील. कधीही पहा ह्या वृद्ध वारकरी जनांचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच असतो. मधेच कोणीतरी “बोला पुंडलिक वरदे…पंढरीनाथ महाराज कि जय” मोठ्ठयाने म्हणत होतं. माझ्यासकट इतरही त्यांना नकळत साथ देत होते.

मी समाधी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या जवळ आलो. मंदिराचं जुनं दगडी बांधकाम भक्कम आहे. आत एक मोठा पाषाणातला, शेंदूर लावलेला गणपती आहे. त्याची पूजा संपन्न होऊन तो काचेच्या दारामागे सुरक्षित बसला होता. एक दालन ओलांडून मी मधल्या गाभाऱ्यात आलो. आपल्या तुकोबांनी हा गाभारा बांधलाय. जगद्गुरू तुकोबांच्या “ज्ञानियांचा राजा गुरू महाराव…” या अभंगात माउलींप्रती असलेला त्यांचा आदर, प्रेम पाहिलं कि आपल्या बेगडी प्रेमाची कल्पना येते. आपण निःशब्द होतो. गाभाऱ्याच्या मध्यभागी वर काचेचं झुंबर लखलखत होतं. बाहेर काही वारकरी लोक ज्ञानेश्वरी वाचताना दिसत होते. मगाशी जो मंत्रपठणाचा आवाज भासला तो यांचा होता तर. ते काय म्हणतायेत हे जरी स्पष्ट ऐकू येत नव्हतं तरी ती लय, तो आवाज कानाला सुखावणारा होता. आता एका छोट्या दारातून गेलं कि गर्भगृहात माऊलींची संजीवन समाधी आहे. दाराच्या वरती दगडात कोरलेला गणपती आहे. बिचार्याच्या सर्वांगाला पेढा चिकटवलेला दिसत होता. खरंतर हे दृश्य  प्रत्येक देवळात पहायला मिळतं. भक्तांच्या श्रद्धेपुढे देवाचं काय चालत नाही. दाराच्या दोन्हीबाजूला बंदिस्त चौकटीत सोन्याच्या पत्र्यावर लिहिलेलं पसायदान आहे. माउलींनी अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी भगवंताजवळ हे अलौकिक मागणं मागितलं. कोणीतरी म्हटलंय कि, “सगळ्या विश्वाचे मिळून जर एकच राष्ट्रगीत ठरवावे अशी कल्पना पुढे आली, तर संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाकडे पहावं लागेल”. किती सार्थ आहे हे! उंबरठ्याला  नमस्कार केला नि आत गेलो. आत समाधीवर अभिषेक सुरु होता. समाधीच्या वरच्या बाजूला देवळीत काळ्या पाषाणातल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. विठूमाऊलीच्या मुखकमलावरचं प्रसन्न स्मितहास्य पाहून मन समाधान पावलं. घरातून नेलेली फुलं पुजाऱ्यांनी विठोबा-रखुमाईच्या मस्तकावर वाहिली. त्या फुलांच्या आयुष्याचं सार्थक झालं. पुजारी लोक समाधीला हात लावून नमस्कार करायला सांगत होते. माउलींच्या भेटीने त्या क्षणाला प्रत्येकाची “आनंदाचे डोही आनंद…” अशीच काहीशी अवस्था झाली असेल. नकळतहात जोडले गेले. मी माउलींपुढे नतमस्तक झालो.

“धन्य आजि दिन, झाले संतांचे दर्शन” ह्या आनंदातच बाहेर आलो. अजानवृक्षाच्या सावलीत काही भाविकांचं ज्ञानेश्वरीचं पारायण चालू होतं. अगदी समाधीला लागून त्याचं अस्तित्व आहे. आणि गंमत पहा कि सारं काही जाणूनही तो स्वतःला अजान म्हणवून घेतो. सुवर्णपिंपळाला प्रदक्षिणा घालून एका पायरीवर जरा विसावलो. गेली कित्येक वर्षे, शतके हा प्राचीन अश्वत्थ माउलींच्या आठवणी हृदयात जतन करून अलकापुरीत लीनतेने उभा आहे. कितीतरी बऱ्या-वाईट घटनांचा तो मूक साक्षीदार आहे. सांप्रतकाळी संतपदीचे सुखसोहळे उपभोगत समाधानाचे अभंग गात आहे. त्याच्या अंगाखांद्यावर आता पाखरांची किलबिल वाढलीये. समाधी मंदिरही आता गजबजु लागलंय. “तनु मन शरण तुझ्या, विनटलो पायी..” असाच भाव इथे जमलेल्या  प्रत्येकाच्या ठायी असेल. सूर्याच्या कोवळ्या रेशमी किरणांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला आहे, अगदी तसाच माझा मन:गाभाराही ह्या ध्यानस्थ ज्ञानसूर्याच्या कृपार्शीवादाने उजळून निघाला आहे.

क्रमशः

 

Advertisements

सई

   कल्या देहानं मी सीटवर आडवा झालो. बॅग उशाकडे सरकवली आणि संपूर्ण जागेचा ताबा घेतला. डोळे मिटले. सकाळ पासून आपण फक्त आणि फक्त चालतोय. पावसानं समृद्ध केलेला सह्याद्री डोळ्यात सामावून घेतोय. या वाटेनं महाराज गेले असतील, इथे बसले असतील. निसर्गानं जपलेल्या त्या पाऊलखुणा पुन्हा पुन्हा पाहतोय. विसाव्याचे काही मोजके क्षण सोडले तर केवळ पावलं उचलतोय. गडाकडे जाणाऱ्या रस्त्यापासून ते गडाचं अखेरचं टोक. पुन्हा उतरणीचा रस्ता. क्षणभर मला त्याच पहुडलेल्या अवस्थेत चालता चालता घसरल्याचा भास झाला. एकदम सावरलं स्वतःला. इतक्यात ट्रेनने आवाज दिला आणि हळूहळू गती ती घेत ती मार्गस्थ झाली. बाहेर पाहिलं. पावसानं पुन्हा जोर धरला होता.

    गाडी तशी रिकामीच होती. समोर आजूबाजूला कोण आहे कुठेच माझं लक्ष नव्हतं. पुन्हा डोळे बंद केले. डब्यात आता थोडा गारठा जाणवायला लागला. मगापासून एका लहान मुलीचा गोड आवाज कानावर पडत होता. बहुतेक ती काही तरी खेळत असावी. मी अर्धोन्मीलित डोळे करून पाहायला लागलो. समोरच्या सीटवर एक आजी आणि एक वर्षांची छोटीशी मुलगी बसलेले दिसले. तिचाच गोड आवाज कानात रुंजी घालत होता. आवाजाप्रमाणे तीही गोडअगदी बाहुलीसारखी. तिने बुद्धिबळाचा डाव मांडला होता. मी डोळे आता पूर्ण उघडले. खेळ खूप वेळ चालला असावा हे आजींच्या त्रासलेल्या चेहेर्यावर मला स्पष्ट कळालं. ती मात्र ते घोडे, उंट, ती प्यादी जे काय दिसेल ते भराभर चालवत होती. बहुदा काही नियम नसावेत. एका निर्णायक क्षणी मात्र आजींनी युद्ध थांबवलं.बाळा बास आता!…नंतर खेळूम्हणत त्यांनी पाण्याची बाटली हातात घेतली. ते बाळ मात्र जिंकल्याच्या आविर्भावात सीटवरून उठलं आणि खिडकीपाशी गेलं. बंद काचेतून बाहेर डोकावत होतं. पाणावलेल्या काचेवर काहीतरी गिरवत होतं. मधेच काहीतरी गुणगुणत होतं. भूकहि लागली असावी. लगेचच खाऊचा परामर्श घेण्यात आला. माझ्याकडेहि पाहत होतं अधेमधे. खरंच फार गोड होती!

   काही पळ गेले असतील आजीच्या मागे पुन्हा खेळायचा तगादा चालू झाला. आजी मात्र आता खरंच वैतागल्या. मला हसू आलं पण मी ते ओठाबाहेर येऊ दिलं नाही. “आपण खेळुयात का?” मी विचारलं तिला. तिनं आजींकडे पाहिलं. त्यांनी हसून मूकसंमती देताच ती रणभूमी घेऊन उठलीच. मी हि उठून बसलो. आजींची मात्र एकदाची सुटका झाली. नावागावाची ओळख झाल्यावर आम्ही दोघे सज्ज झालो. खरंतर या बुद्धिबळाच्या खेळात मी एक सामान्य बुद्धी असलेला. आणि या बाळाचा खेळ पाहता माझं निभाव लागणं केवळ अशक्य होतं. तिचे स्वतःचे काही नियम होते जे प्रत्येक वेळी बदलत असतील. आणि युद्ध जसं जसं पुढे सरकत होतं तसा त्याचा प्रत्यय आलाच. आजींकडे पाहिलं…मस्त डुलक्या घेत होत्या. मधेच ती थांबवून काही शाळेतल्या गोष्टी सांगत होती. खाऊ हि चालूच होता. मधूनच एखादं सिनेमाचं गाणं ऐकवायचं, जे अर्थातच तोंडपाठ होतं. दहा-बारा तरी डाव संपले. अर्थात खेळाचा वेग प्रचंड होता. बहुतेक वेळा मीच हरलो असेल. आणि ते हरणं मला भागच होतं. आणि तसही या गोड मुलीकडून हरणं हीच खरंतर जीत होती!!

   गाडीचा वेग कमी होतोय हे माझ्या ध्यानी आलं. नुकताच नवीन डाव सुरु झाला होता. माझी उतरायची वेळ झाली. गाडी थांबली. पर्यायाने मलाही थांबणं भाग होतं. हा प्रवास कधी संपला समजलंच नाही. आजीही जाग्या झाल्या. “चल सईमाझं गाव आलं.” नाराजीचे भाव तिच्या डोळ्यात उतरताना दिसले. तिच्याकडं पाहवेना मला. मी पटकन बॅग उचलली आणि ट्रेन च्या बाहेर आलो. बाहेर रिमझिम पाऊस चालूच होता. गाडीने आवाज दिला तसं मी मागे वळून पाहिलं. पहातो तर सई डब्याच्या अलिकडच्या खिडकीपाशी येऊन थांबली होती. काय करावा मला कळेना. निमिषात मी तिच्याकडे गेलो. तिचा हात माझ्या हातात घेतला आणि हातावर एक पापी दिली. इतक्यात गाडी निघाली. पावसाचा जोर अचानक वाढला आणि त्या वेगातच गाडी निघूनही गेली. दूर धूसर होणारे ट्रेनचे दिवे मी पाहत राहिलो. अवघ्या दोनेक तासांपूर्वी आम्ही भेटलो होतो. कधी कधी निरोपाचे क्षण फार लवकर येतात!!

मधला काळ

थोडं माणसांच्या गर्दीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात, आपलं स्वतःचं असं एखादं ठिकाण असतं जिथे आपल्याला एकट्यानेच जावंसं वाटतं. एक वेगळंच समाधान मिळतं तिथे गेल्यावर. मन शांत होतं. नकारात्मक विचार दूर जातात. आपण आपल्याशी जरा जास्तीच बोलतो, विचार करू लागतो. रोजचं धकाधकीचं जीवन म्हणून आपण जे काही म्हणतो त्या अवस्थेत ती शांतता बरंच काही देऊन जाते.

माझ्या आजोळी बेळगावला मला भावाने असंच एक ठिकाण दाखवलं. आम्ही थोडं शहरापासून दूर गेलो. एक उंच चढण असलेला रस्ता पार केला आणि समोर जे दृश्य दिसलं ते केवळ अप्रतिम होतं. उतरणीवर एक अगदी छोटंसं तळं नि त्याच्या टोकाला एकच झाड. आजूबाजूला बरेचसे तांबड्या मातीतले छोटे-मोठे दगड पसरले होते. पावसाळ्याचे दिवस असल्याने संपूर्ण परिसर हिरवागार झाला होता. तळ्याच्या बाजूने तेरड्याची गुलाबी फुलं उमलली आहेत. पुढे लागूनच शेती दिसत आहे. एक दोन कौलारू घरं आहेत. हिरवं कोवळं गवत खाणारी गुरं आहेत. दुसऱ्या बाजूला उंचावर गर्द झाडी आहे. वर पावसाळी काळे पांढरे ढग जमलेत. एखाद्या निसर्ग चित्रासारखं होतं सगळं. मुख्य म्हणजे माणसांची गर्दी आजिबातच नव्हती. आम्ही सोडल्यास निर्मनुष्यच जवळ जवळ. मन हरकून गेलं होतं अगदी.

पुढे जेव्हा जेव्हा बेळगावला जाणं व्हायचं तेव्हा तेव्हा न चुकता मी एकटाच तिथे जाई. शक्यतो संध्याकाळीच जात असे. तिथे माझ्या सारखाच एखादा, तर कधी चार पाच मित्र मैत्रिणींचा कट्टा जमलेला असायचा. बोटावर मोजता येतील एवढीच माणसं. बाकी समोर ते तळं, काठावर पाण्यात उतरणारे छोटे शुभ्र बगळे. अगदी दूरपर्यंत दिसणारी शेती, घरं. ऋतूप्रमाणे तिथला निसर्ग जरी बदलत होता तरी मनाला मिळणारी शांतता तशीच अबाधित असायची. अंगावर थंड वारं झेलत तिथला मावळतीचा सूर्य पहात स्वतःला हरवल्या सारखं वाटे. त्या प्रसन्न वातावरणात अनेक नव्या चांगल्या गोष्टी सुचत. कधी अभिषेकी बुवांचे “शब्दावाचून..,” किंवा बकुळ ताईंचं “का धरिला परदेस..” अशी गाणी ऐकत ती सांजवेळ कधी संपायची समजायचच नाही.

नंतर दोन-तीन वर्षे काही मला तिथं जायला जमलं नाही. त्या ठिकाणाबद्दलही मी कोणाला काही सांगितलं नव्हतं. एकदा बेळगावला गेल्यावर मात्र ठरवलं आज तिथे जायचंच आणि सोबत घरच्यांनाही न्यायचं. गाडी वळवलीच. पावसाळा मध्यावर आला होता. तो उंच चढणीचा रस्ता पार केला आणि पोहचलो एकदाचा. पण….समोर जे मी काही पाहतोय ते काय दिसतय माझं मलाच कळेना. आज तिथे ते मोठे मोठे दगड नव्हते. ती तळ्यापर्यंत जाणारी छोटीशी पायवाट नव्हती. पाऊस असूनही ते तळं अजून छोटं दिसत होतं. ते झाडही वाळलेलं दिसत होतं. आजूबाजूला मोठे बंगले. इतक्या कमी वेळात हा इतका बदल. परिसर हिरवागार झालेला होता, शेतीही दिसत होती. तरी मी जे आधी पाहिलं होतं ते इथं काहीच नव्हतं. ती शांतताच कुठेतरी हरवली होती. घरच्यांना तरीही ते सगळं आवडलं. मला मात्र तिथं थांबवेना. लगेचच परतलो कारण आता तिकडे माझ्या दृष्टीने बघण्यासारखं काहीच उरलं नव्हतं.

घरी येताना मी विचारात गुरफटलो होतो. कुणाच्या बोलण्याकडेही माझं लक्ष नव्हतं. असं का व्हावं? डोळ्यांना, मनाला सुखावणाऱ्या निसर्गाच्या एका तुकड्यावरचं हे माणसाचं अतिक्रमण होतं. पुढे बरेच दिवस हे विचार डोक्यात घर करून होते. आणि कोणत्या तरी क्षणी खूप आधी वाचलेला शन्नांचा (श. ना. नवरे) एक लेख आठवला. अगदी तसंच तर घडलं होतं हे. उत्तर मिळालं होतं आणि त्या विचारचक्रातून मी काहीसा बाहेर आलो. शन्ना म्हणत होते, “आपण पाहिलेली ठिकाणं, आपण राहिलो ती गावं, घर, निसर्ग….प्रत्येक गोष्ट जूनी होत जाते. मग आपल्या मनानं फ्रीज केलेलं ते दृश्य आपण पुन्हा पाहू गेलो असता मूळ दृश्याशी जुळत नाही. आपला विरस होतो, दुःखही होतं. मग अशावेळी काय करावं?…..काय करावं हे ज्याचं त्यांनं ठरवायचं आणि सहन करायचं असतं. सोपा मार्ग म्हणजे आपल्या जुन्या आवडत्या गोष्टींच्या आठवणी तशाच फ्रीज करून ठेवाव्यात. त्या नव्यानं अनुभवायचा हट्ट धरू नये. हा दोन भेटींच्या मधला काळ कधी कधी आपला शत्रू ठरतो.”

– सौरभ